पुणे : शहरातील नरवीर तानाजी मालुसरे रस्ता अर्थात सिंहगड रोड परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे मेट्रोचे काम लवकर सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता या भागातील नागरिकांची मेट्रोची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) खडकवासला ते दांडेकर पूल या मार्गावरील मेट्रो बांधकामाच्या निविदा रद्द केल्या आहेत. या रस्त्यावरील सुमारे अडीच किलोमीटरच्या टप्प्यात मेट्रो आणि उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) एकाच खांबांवर दुमजली स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महामेट्रोने जून २०२६ मध्ये खडकवासला ते दांडेकर पूलदरम्यानच्या नऊ किलोमीटर मार्गावरील मेट्रो बांधकामासाठी निविदा काढल्या होत्या. दरम्यान, पुणे महापालिकेच्या एचसीएमटीआर प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. मेट्रो आणि एचसीएमटीआर या दोन्ही प्रकल्पांची आखणी काही ठिकाणी एकमेकांना छेदत असल्याने कामाची दिशा निश्चित करण्याबाबत महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.
या निविदांना सात वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेर शहरातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच मेट्रो आणि एचसीएमटीआर एकाच खांबावर दुमजली पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यापूर्वी काढलेल्या नऊ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाच्या निविदा रद्द कराव्या लागल्या आहेत.

निविदा रद्द झाल्यामुळे या मार्गावरील बांधकामासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता सिंहगड रोडवरील मेट्रोचे प्रत्यक्ष काम पुढील किमान तीन ते सहा महिने सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सहा महिन्यांत महामेट्रोने या मार्गासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यामुळे २०२६ वर्षअखेरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, निविदा रद्द झाल्याने मंजुरी मिळून एक वर्ष उलटले तरी सिंहगड रोडवरील मेट्रो प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
सिंहगड रोड परिसरातील वाढती लोकसंख्या आणि शहराच्या विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता या मार्गावरील मेट्रोचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. पुढील अडीच ते तीन वर्षांत मेट्रो सुरू होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, एकाच रस्त्यावर मेट्रो आणि एचसीएमटीआरसह अनेक प्रकल्पांची कामे एकत्रितपणे करावी लागणार असल्याने नियोजन आणि अंमलबजावणीला वेळ लागत आहे. परिणामी, सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना मेट्रोसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.






