पिंपरी : राज्यासोबत शहरातही पावसाचा जोर वाढत असून सगळीकडे जलमय वातावरण झाल आहे. पावसाळ्यामुळे अनेक आजारांचा धोका उद्भवू शकतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
तथापि, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करुन घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे. ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
तसेच पाणीपुरवठा विषयक तक्रारींसाठी सारथी अथवा प्रभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तक्रारींचे निवारण तातडीने करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.