पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एक अपघाताची घटना घडली आहे. भरधाव डंपरने सायकल हातात घेवून जाणाऱ्या पादचारी व्यक्तीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील चोखीधानी रोडवर उबाळे नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समाधान इंद्रजित सरडे (वय २०, रा वाघोली) यांनी फिर्याद दिली. इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय-५८ वर्षे, पोतदार स्कुलशेजारी, वाघोली) असं मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक राजु पांडु चव्हाण (वय २४ वर्षे, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत हे दूध वितरित करून हातात सायकल घेवून घराकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होवून मृत्यूमुखी पडले. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
बाणेर परिसरात हॉटेल ऑर्चिड समोरुन राहुल शिवराम नाईकनवरे (वय-50, रा. थेरगाव, पुणे) हे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी एका स्वीफ्ट कारने भरधाव वेगाने, वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यामुळे तक्रारदार यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वाटीमध्ये फॅक्चर झाले.
तसेच त्यांच्या डाव्या खांद्यास मुका मार लागला असून डाव्या डोळयाच्या भुवईवर खरचटले व ते जखमी झाले. मात्र, त्यांना कोणती वैद्यकीय मदत न करता कारचालक पसार झाला. याप्रकरणी कारचालक अनिल वाघमारे याच्यावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.