पुणे : पुण्यातील विभागीय कार्यालयात पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून पासपोर्ट कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांना ऑनलाइन अर्ज करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज करताना शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, ही समस्या लवकरच दूर केली जाईल, अशी भूमिका पारपत्र कार्यालयाने घेतली आहे.
सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून पुण्यातील पारपत्र कार्यालयाच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक समस्या झाली आहे. येथे दररोज सुमारे एक हजार ते बाराशे जणांच्या पारपत्र अर्जांवर कार्यवाही केली जाते. मात्र, संकेतस्थळातील समस्येमुळे अर्जदारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. कार्यालयाकडून अर्जदारांना याबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची तक्रार देखील केली जात आहे.
दरम्यान, कोरोना संकटामुळे २०२० आणि २०२१ मध्ये अनेक जणांनी त्यांच्या पारपत्राची मुदत संपूनही नूतनीकरण केले नव्हते. कोरोना निर्बंधांमुळे अनेकांना हे नूतनीकरण करता आले नव्हते. निर्बंध हटविण्यात आल्यानंतर नूतनीकरणासाठीचे अर्ज मोठ्या प्रमाणात वाढले. आधीचे प्रलंबित अर्ज आणि नवीन अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी पारपत्र कार्यालयाकडून अनेक मोहिमा राबविल्या जात आहेत.
लवकरच तांत्रिक समस्या दूर होईल
पारपत्र कार्यालयाचे संकेतस्थळ आणि सर्व्हरच्या देखभालीचे काम पुण्यातील विभागीय पारपत्र कार्यालयाकडे नाही. काही अर्जदारांना बुधवारपासून (ता.६) पारपत्रासाठी अर्ज भरताना संकेतस्थळावर काही अडचणी येत असल्याचे समोर आले. आमच्या केंद्रीय तांत्रिक विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून, लवकरच ही तांत्रिक समस्या दूर होईल.
अर्जुन देवरे, विभागीय पारपत्र अधिकारी, पुणे