लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर ओव्हरलोड साहित्य घेऊन येणारे मोठे ट्रक, लॉरीसहित मुरमाचा डंपर, खडीचे ट्रक, स्टील घेऊन येणारी लॉरी, सॅण्डक्रशची सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. यामुळे दुचाकी, रिक्षा चालवणाऱ्या अन्य वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ओव्हरलोड वाहतुकीच्या वाहन चालकांचे आर्थिक लागेबांधे यामुळे अशी वाहने बिनधास्त फिरतात. त्यांच्यावर कोणीच कारवाई करताना दिसत नाही.
आरटीओ गप्प बसतात, तर पोलिसांकडून कारवाई पेक्षा त्यांनाच सूट दिली जाते. त्यामुळे ओव्हरलोड वाहने पकडणार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ओव्हरलोड वाहतूक अवैध आहे, याची कल्पना असूनही पोलिस, आरटीओ त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक सुरूच आहे. त्या सोबत प्रवासी घेऊन जाणाऱ्या तीनचाकी रिक्षा, वडापमधूनही प्रवासी जात आहेत. मात्र त्यावरही निर्बंध राहिलेला नाही. सहा आसनी रिक्षा चालक व रिक्षा चालक नेमून दिलेल्या प्रवासी संख्येपेक्षा डबल प्रवासी वाहतूक करीत आहेत. अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र, त्याकडे आरटीओ, पोलिस दुर्लक्ष करत आहेत. सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी लोकच आता त्यांच्याविरोधात आंदोलन करतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंत्रणा होतेय मॅनेज
जड साहित्य घेऊन येणारी वाहने ती ओव्हरलोडच असतात. अशा वाहनांचा प्रवास सामान्य जनतेच्या जिवावर बेततो आहे. येथील महामार्गावर ओव्हरलोड होऊन निघालेली वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. वर्षभरात किमान २० ते २५ अपघात या मार्गावर झाले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त साहित्य वाहून नेतानाच ते अपघात झाल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र, त्या अपघातांची क्वचितच पोलिसात नोंद असते. वाहनचालकांकडून पोलिस किंवा तत्सम यंत्रणा मॅनेज करून त्या घटना दाबल्या जातात. रात्रीत दुसरे वाहन बोलावून ते साहित्य तेथून पसार केले जाते.
फिटनेस सर्टिफिकेटचा पत्ता नाही
आरटीओ फिटनेस नसलेल्या ट्रॅव्हल्स गाड्यांचीही वाहतूक सर्रास दिसते आहेत, तरी देखील गंभीर दखल घेतली जात नाही. त्याचे फिटनेस सर्टिफिकेटही तपासले जात नाही. पुणे – सोलापूर महामार्गावर अशी ओव्हरलोड वाहने जाताना दिसतात. ते वाहन आता पलटी होतेय की काय? इतके वाहन खचाखच भरलेले असते. त्यावरही कारवाई होताना दिसत नाही किंबहुना अशी वाहनेच आरटीओ व पोलिसांना कशी दिसत नाही, हेच आश्चर्य आहे. त्यामुळे अशा अवजड वाहनांवर कारवाई होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.