पुणे : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (महिला), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 4 ते 19 मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका 24 मार्च रोजी दुपारी चार वाजल्यापासुन ते 28 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना/आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने 24 ते 28 मार्च या कालावधीत नोंदविण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सूचना/आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. 100/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.
24 ते 28 मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सूचना/आक्षेप विचारात घेतले जातील. त्यानंतरचे सूचना/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सूचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.