उरुळी कांचन, (पुणे) : संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून देण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव राज्यस्तरीय विशेष पुरस्कार सोरतापवाडी (ता. हवेली) येथील उद्योजक तथा जी. बी. डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर निलेश गुलाब चौधरी यांना जाहीर झाल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष हगवणे, सागर जगताप, अजयसिंह सावंत, संदीप जगताप यांनी दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. 14) संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित भव्य सोहळ्याचे आयोजन किल्ले पुरंदर येथे करण्यात आले आहे. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, कोषाध्यक्ष अमोल काटे उपस्थित राहणार आहेत.
तर प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत चौधरी यांना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान, निलेश चौधरी यांना छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव राज्यस्तरीय विशेष पुरस्कार जाहीर झाल्याने परिसरातून तसेच सोशल मिडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याबाबत बोलताना उद्योजक निलेश चौधरी म्हणाले, “आजपर्यंत केलेल्या चांगल्या व प्रामाणिक व्यवसायाची पोहोचपावती म्हणून संभाजी ब्रिगेडने दखल घेतली. त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब त्यांचे आभार मानतो. तसेच आई-वडिल व कुटुंबियांनी केलेल्या कामावर संभाजी ब्रिगेडने विश्वास ठेवला याचे समाधान आहे. या पुरस्कारासाठी निवडल्याने आनंद झाला आहे.”