शिरूर: शिरूर येथील एस.टी. बसस्थानकावर प्रवासासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता.११) दुपारी घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रूपाली अनिल काळेल (वय ४८,रा.त्रिमूर्ती नगर-जळोची, ता.बारामती,जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, रुपाली काळेल या मलठण (ता. शिरूर) येथे भाच्याच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न समारंभ उरकल्यानंतर रूपाली काळेल बारामती तालुक्यातील त्रिमूर्ती नगर-जाळोची गावी परत जाण्यासाठी शिरूर एस.टी बस स्थानकावर मुलगी व भाचीसह रविवारी (ता.११)दुपारी आल्या. दरम्यान,शिरूर बस स्थानकात थांबलेल्या केडगाव-चौफुला बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने रूपाली काळेल यांच्या पर्समधील साडे सहा तोळे सोन्याचे गंठण व तेरा ग्रॅम सोन्याची कर्णफुले असा एकूण ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरला. बसमध्ये चढल्यानंतर रुपाली काळेल यांनी पर्स उघडून पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर रुपाली काळेल यांनी संबंधित घटना नातेवाईक व पोलिसांना सांगितली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
शिरूर बसस्थानक हे पुणे व अहिल्यानगर, विदर्भ, मराठवाड्याला जोडणारे महत्वाचे बसस्थानक असल्याने येथे प्रवाशांची कायम गर्दी असते. शिरूरसह पारनेर, श्रीगोंदे या तालुक्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असतानाही बसस्थानकावर बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी पोलिस नसल्याचे स्थानिक प्रवाशांनी सांगितले. चंदाबाई चव्हाण या होमगार्ड मात्र कायम बंदोबस्तास असतात. त्यांचा बसस्थानकावर चांगला दबदबा असतो. परंतु, त्यांच्या जोडीला एक किंवा दोन पोलिस कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी नेमावेत, अशी मागणी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केली.