पुणे : पुणे महापालिकेने शहरात सुरू असलेली अतिक्रमण विरोधी कारवाई हा मनमानीचा प्रकार असल्याचा आरोप पुणे शहर छोटे व्यावसायिक, गाळेधारक, भाडेकरू महासंघाने केला आहे. सोसायट्यांमधील अधिकृत गाळेधारकांवर कारवाई केली जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे. याची दखल घेतली नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह परिसरातील अधिकृत गाळेधारकांना महापालिका त्यांचे गाळे बंद करून देशोधडीला लावत आहे, असं महासंघाचे निमंत्रक हसीब कलमानी यांनी यावेळी बोलताना सांगितले. परिसरात इमारतीच्या टेरेसवरील बेकायदेशीर हॉटेल्स सुरू आहेत. त्यांना मोकळे सोडून लहान व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई आणि तीसुद्धा बेकायदेशीर केली जात आहे, असं ते म्हणाले.