शिरूर : कवठे येमाई (ता.शिरूर) गावच्या हद्दीत गांजेवाडी परिसरात सुखोई विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाईप व मेटल पार्ट लढाऊ विमानातून पडल्याची घटना मंगळवारी (दि.१७) घडली. अथक परिश्रम घेत शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी (बुधवारी) सकाळी पोलीस पाटील गणेश पवार यांच्या कार्य तत्परतेने हे साहित्य सापडले.
कवठे येमाई परिसरात पडलेला पाईप आणि मेटल पार्ट शोधण्यासाठी मंगळवारी वायुसेनेचे पथक आणि शिरूर पोलीस येथे दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. अंधार पडल्याने व परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.
बुधवारी (ता.१८) सकाळी येथील पोलीस पाटील गणेश पवार हे त्यांच्या मुलाला बरोबर घेऊन पाहणी करण्यास गेले आता त्यांना नदीच्या बाजूला निर्जनस्थळी हे साहित्य पडल्याचे दिसून आले. पवार यांनी तात्काळ शिरूर पोलिसांना कळविताच पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल उगले सहकाऱ्यांसह तिथे उपस्थित झाले. त्यानंतर हे साहित्य वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सोशल मीडियावर या घटनेची माहिती पसरल्याने स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. शोधमोहिमेमध्ये वायुसेना, शिरूर पोलीस आणि कवठे येमाई परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. निर्जन ठिकाणी हा भाग पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. पोलीस पाटील गणेश पवार यांनी कर्तव्यात कसूर न करता शोध घेण्यात महत्वाची भूमिका बजावल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.