लोणी काळभोर, (पुणे) : मराठा आरक्षणासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मराठा आंदोलक सुर्यकांत काळभोर या उपोषणकर्त्याची प्रकृती गुरुवारी (ता. ०२) खालावल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरु केले आहेत. मागील सात दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहे. तसेच प्रशासनातील काही अधिकारी या आंदोलनस्थळी आले नसल्याने आंदोलनकर्ते रोष व्यक्त करत आहेत.
लोणी काळभोर येथील खोकलाई चौक परिसरात सुर्यकांत काळभोर हे मागील सात दिवसांपासून उपोषणाला बसले असून काळभोर यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्यांना महसूल विभाग, तहसीलदार, प्रांत (उपविभागीय अधिकारी), पंचक्रोशीतील आदी मराठा बांधवांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते काळभोर यांनी स्पष्ट नकार देत मराठा आरक्षण मिळेपर्यंत मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ठामपणे सांगितले.
गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. तब्येतीच्या काळजीबाबत उपचार सुरू करण्यात आले असून, शाळेतील मुलांसह गावातील विविध गावाचे पुढारी, स्थानिक नागरिक त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करत आहेत. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचनसह परिसरात साखळी उपोषण सुरु आहेत.
दरम्यान, सदर ठिकाणी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, दिगंबर जोगदंड, चेअरमन संजय भालेराव, संतोष भोसले, रमेश भोसले, सचिन काळभोर, मुस्लीम बांधव व आदी मान्यवर उपस्थित होते.