लोणी काळभोर: खाजगी कोचिंग क्लासला शिकवणीसाठी गेलेल्या नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनींला फुस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. युवराज सोमनाथ सोनवणे (वय-22, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही लोणी काळभोर येथील एका नामांकित शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच तिने लोणी काळभोर येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी लावली आहे. अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे 30 डिसेंबर 2023 रोजी क्लासला गेली होती. तेव्हा आरोपी सोनवणे याने अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणाचे आमिष दाखवून फुस लावली आणि तिला पळून घेऊन गेला होता.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी सोनवणे यांच्या विरोधात भा.द वि. कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सोनवणे याला मोठ्या शिताफीने अटक केली. तर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे व पोलीस हवालदार केतन धेंडे यांनी केली आहे.