Grampanchayat Election: पुणे : राज्यामध्ये पार पडलेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी हाती आले. या निवडणुकीत महायुतीने निर्विवादपणे वर्चस्व सिद्ध केले आहे. निकालानंतर भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष ठरला असून त्याखालोखाल राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) या पक्षांनी दणदणीत विजय मिळवले आहेत.
हाती आलेल्या निकालांनुसार भाजपने 697 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असून शिवसेना (शिंदे)- 235, राष्ट्रवादी (अजित पवार)- 321 ग्रामपंचायती जिंकल्या. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस- 137, शरद पवार गट 142 आणि उद्धव ठाकरे गटाने 94 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.
राज्यामध्ये भाजपने केलेला महायुतीचा प्रयोग सध्यातरी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, महायुतीने दुपारपर्यंत 1277 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीकडे 497आणि इतरांकडे 341 ग्रामपंचायती गेल्या.
अजित पवार यांची मोठी मुसंडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. त्यात अजित पवार यांनी वर्चस्व मिळवले. बारामती तालुक्यात अजित पवार यांच्या गटानेच वर्चस्व निर्माण केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची कामगिरी दमदार दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण जनता अजित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आहे. ते सध्या तरी दिसत आहे.
ठाकरे गटाची पिछेहाट
शिवसेनेतूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत त्यांनी आपला नवीन गट निर्माण केला. पुढे जाऊन निवडणूक आयोगाने त्यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता दिली. एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ही मात्र पहिली निवडणूक नव्हती. यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची कामगिरी चांगली झाली होती. सध्या मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे गटाला चांगलेच मागे टाकले आहे. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे.