मुंबई: महाराष्ट्र सरकारने जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या नवीन धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडून येतील. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अभ्यासक्रमाची चार स्तरांमध्ये विभाजन करणारी एक नवीन अभ्यासक्रम रचना करण्यात आली असून जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केला असून, शिक्षणाच्या पद्धतीत आणि रचनेत मोठा बदल अपेक्षित आहे.
अभ्यासक्रमाची चार स्तरांमध्ये विभाजन करणारी एक नवीन अभ्यासक्रम रचना आखण्यात आली असून यात पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक हे टप्पे वयोगटानुसार ठरवले गेले आहेत. प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
प्रमुख मुद्दे
– मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषा शिकणे अनिवार्य
– इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम जून 2025 मध्ये लागू करण्यात येणार
– दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे नवे अभ्यासक्रम 2026-27 मध्ये लागू करण्यात येणार
-पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीतील नवे अभ्यासक्रम 2027-28 मध्ये मध्ये लागू करण्यात येणार
– 2028-29 मध्ये आठवी, दहावी आणि बारावीचे अभ्यासक्रम नव्याने तयार केले जाणार आहे.
– नवीन शिक्षणपद्धतीत एनसीईआरटीच्या धर्तीवर समग्र, मूल्य-आधारित आणि कौशल्य-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
शाळेच्या वेळापत्रकात, विषय नियोजन, मूल्यांकन पद्धती आणि परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ७५% उपस्थिती अनिवार्य केली आहे, हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजनच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल आणि शाळांना हे नियोजन जूनपूर्वी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एनसीईआरटी मॉडेलचे अनुसरण करून नवीन अभ्यासक्रम चौकट विकसित करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांना आवश्यक मार्गदर्शन आणि नियोजन कागदपत्रे प्रदान केली जातील. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा उद्देश राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणे आहे, ज्यामध्ये समग्र विकास आणि कौशल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल.