केडगाव: जानेवारी ते मार्च या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कालावधीत मुदत संपणार्या दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहे. यामध्ये एकेरीवाडी ग्रामपंचायतच्या लोक प्रतिनिधींचा कार्यकाळ रविवार 3 मार्च 2024 रोजी संपला असून 4 मार्च पासून राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या एकेरीवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासकीयराज असणार आहे.
दौंड तालुक्यातील मागील सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या पहिल्या टप्प्यातील एकूण 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या होत्या. डिसेंबर 2023 पासून दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या जातात. मात्र, अद्याप या ग्रामपंचायतींचे प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेला जवळपास महिना-दीड महिना लागणार आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नेमणूका केल्या आहेत.
यामध्ये एकेरीवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समितीचे अधिकारी महादेव भंडलकर यांची नियुक्ती झाली आहे, तर सचिव म्हणून एकेरीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नीलकंठ गायकवाड हे काम पाहत आहे.
गावात निवडणूक हाच चर्चेचा विषय
एकेरीवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक कधी लागते अन कधी नाही अशी स्थिती सत्ताधारी, विरोधकांबरोबर गावातील मतदारांची झाली आहे. निवडणूक केव्हा लागणार याची अद्याप तरी स्थानिक पुढार्यांना कल्पना नाही. मात्र, तरीही बैठका जोर धरू लागल्या आहे. काहींना तर ‘उमेदवारी तुम्हालाच, कामाला लागा’ असे आश्वासन देखील देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण जोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागत नाही, तोपर्यंत तरी गावात ग्रामपंचायत निवडणूक चर्चेचा विषय राहणार आहे.