Mahabaleshwar Tourism: महाबळेश्वर येथे महापर्यटन महोत्सव 2025 2 मे ते 4 मे 2025 या कालावधीत होणार आहे. हा तीन दिवसांचा कार्यक्रम एक अविस्मरणीय अनुभव असेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव घेण्यात येणार आहे. दरम्यान, या महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना तीन दिवस टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. हा खास महोत्सव पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम घेऊन करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारसह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनही ता. २ मे रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवानिमित्त १०० हून अधिक स्टायलिश तंबू उभारले जातील, जे निसर्गाच्या सान्निध्यात एक वेगळा अनुभव देतील. या महोत्सवात लोकनृत्य, संगीत, पथनाट्येचे ही सादरीकरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
जाणून घ्या, कार्यक्रम
– विशेष कार्यक्रम: वेण्णालेक येथे पाण्यावर तरंगता बाजार भरविला जाणार, पॅराग्लायडिंग, घोडेस्वारी आणि जलक्रीडा.
– अन्न महोत्सव: स्ट्रॉबेरी-थीम असलेले स्वादिष्ट पदार्थ, स्थानिक महाराष्ट्रीयन पाककृती आणि उत्कृष्ठ खाद्यपदार्थांचे स्टॉल.
– ड्रोन लेझर शो: सिंक्रोनाइज्ड ड्रोनचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन.
-टोल सूट: पर्यटक तीन दिवस टोल-फ्री प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
– कार्निव्हल परेड: पारंपारिक आणि पाश्चात्य संस्कृतीचे मिश्रण.
या महोत्सवाचे उद्दिष्ट शाश्वत पर्यटनाला चालना देणे, स्थानिक व्यवसायांना चालना देणे आणि जागतिक दर्जाचे कार्यक्रम केंद्र म्हणून महाराष्ट्राची क्षमता प्रदर्शित करणे आहे.महाबळेश्वरच्या साबणे रस्ता येथे ३ मे रोजी एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. महोत्सवात पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे, 4 मे रोजी समारोप सोहळ्यापूर्वी जागर, नाशिक ढोल, लावणी, गोंधळ इत्यादींचे सादरीकरण होणार आहे.