लोणी काळभोर, ता. 31: लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यतत्परतेचे अजून एक अनोखे दर्शन आज पाहायला मिळाले आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरातील झाडांना अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (ता.31) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दोन बहाद्दर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीच्या एका बाजूला मोठी लोकसंख्या तर दुसऱ्या बाजूला वनराई होती. त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक होते. कारण आग पसरली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दोन वीरबहाद्दरांनी समयसूचकता दाखवून स्वत: बादलीच्या सहाय्याने आगीवर पाणी मारले. आग आटोक्यात आणण्यासाठी मोकळा पट्टा तयार केला. आग पुढे पसरू नये म्हणून नागरिकांच्या सहाय्याने उपाययोजना केल्या. त्यांच्या या एक तासाच्या अथांग प्रयत्नानंतर आग विझली. यादरम्यान, त्या कर्त्यव्यदक्ष पोलिसांच्या अंगाला आगीच्या झळा व चटके मोठ्या प्रमाणात बसले आहेत.
पोलिस अंमलदार इंद्रजीत डाडर व मयूर बोरावके असे आगीवर नियंत्रण मिळविलेल्या दोन जिगरबाज पोलिसांची नावे आहेत. त्यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे आज मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे या दोन पोलिसांनी कर्त्यव्यनिष्टा बजावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दोनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीएमआरडीएची वाघोली येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी अकरा वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. तोपर्यंत आग विझलेली होती. मात्र लाकडांमधील निखारा पेट घेत होता. त्यानंतर फायरमन मयूर गोसावी, सुरज इंगवले, महेश पाटील, विश्वास दराडे व वाहनचालक संदीप शेळके यांनी निखारावरती पाण्याचा मारा केला व आग पूर्णपणे विझविली.