लोणी काळभोर,(पुणे) : अलीकडच्या काळात लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून बेपत्ता ४ वर्षाची दोन लहान मुले पोलिसांच्या समयसुचकतेमुळे अवघ्या तासाभरात आईवडिलांच्या कुशीत सामावली आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात कौतुक केले जात आहे.
मुलीसा प्रकाश थापा (वय- ०४) व प्रतिक प्रकाश थापा (वय – साडेतीन वर्ष), रा. दोघेही, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), अशी मुलांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ०५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील हे कदमवाकवस्ती परिसरातील संभाजीनगर परिसरात राहतात. शुक्रवारी (ता. ०५) घरातील गस संपल्याने दोन्ही मुलांना घरी ठेऊन दोघेही गस आणण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरापासून खेळता-खेळता दोन्ही मुले वाट चुकली, एक-दोन नाही तर घरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत लोणी काळभोर स्मशानभूमी परिसरात येऊन थांबले.
यावेळी वाहनांच्या कर्णकर्कश आवाज, गाड्यांच्या गोंगाटात दोन्ही मुले स्मशानभूमी येथील रस्त्यावर वाहनांना आडवे पळताना आनंद खाडे (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना दिसली. त्यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व पोलीस हवालदार योगेश कुंभार यांना मुलांची माहिती दिली. जोजारे यांनी मुलांना नाव विचारण्याचा प्रयत्न केला मात्र लहान असल्याने त्यांना स्वत:चे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर त्यांच्या आई-वडिलांना शोधण्याचे आव्हान होते.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोजारे व त्यांचे सहकारी शोध घेऊ लागले. शोध घेत असताना संभाजीनगर येथील प्रकाश थापा यांची दोन्ही मुले बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खात्री करून दोन्ही मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन केली. सलग दुसऱ्यांदा अशी कामगिरी केल्याने पोलिसांकडे आशावादी नजरेने नागरिक बघत असल्याचे या घटनेने सिद्ध होत आहे.