लोणी काळभोर : हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून अड्डा उध्वस्त केला आहे. या छाप्यात पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून सुमारे 1 लाख 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती परिसरात असलेल्या नवीन कॅनॉलच्या शेजारी रविवारी (ता.9) रात्री पावणे दहा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास केली.
बादशाह नाथा रजपूत (रा. कोळपे वस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याअगोदरही आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ)(क)(इ) प्रमाणे 7 गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार शैलेश चांगदेव कुदळे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार चेकींग व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे यांना कोळपे वस्ती परिसरात असलेल्या नवीन कॅनॉलच्या शेजारी हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी तातडीने छापा टाकून तयार हातभट्टी दारु, रसायन व हातभट्टी तयार करण्याकरीता लागणारे साहित्य असा एकूण 1 लाख 44 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी बादशाह नाथा रजपूत हा फरार झाला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रामहरी वनवे, गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, पोलीस अंमलदार चक्रधर शिरगीरे, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदिप गाडे यांच्या पथकाने केली आहे.