लोणी काळभोर, (पुणे) : कवडीपाट टोलनाक्यावर अल्पवयीन मुलांवर मारहाण करून खुनी हल्ला करणाऱ्या सहाआरोपींच्या मुसक्या केवळ 12 तासांत आवळत लोणी काळभोर पोलिसांनी गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
अक्षय अशोक बदर (वय -28, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), व प्रसाद खंडू ढोबळे (वय-21, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) व इतर चौघे अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 26) पहाटे पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ सुरज वाघमारे (वय 16 रा. मांजरी बुद्रुक) हा त्याच्या तीन मित्रांसह प्रेम (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) याच्याकडे पैसे मागण्यासाठी कवडीपाट टोलनाका परिसरात गेला होता. प्रेम याचे घर माहित नसल्याने त्यांनी टोलनाका परिसरात चहा हॉटेलजवळ थांबलेल्या तीन अनोळखी व्यक्तींना विचारणा केली. त्यानंतर अचानक त्या अनोळखी व्यक्तींनी इतर साथीदारांना बोलावून घेतले व शंकर कदम आणि शाहीद शेख यांच्यावर हॉकी स्टिक व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा (गु. र. नं. 185/2025) दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत असताना पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर होते. सदर गुन्ह्यात तपास करीत असताना, पथकातील पोलिस हवालदार विलास शिंदे व बाजीदार वीर यांना एका खबऱ्यामार्फत ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
दरम्यान, सर्व आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाले असताना देखील 12 तासांच्या आत लोणी काळभोर पोलीसांनी सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्णरित्या तपास करुन तांत्रीक पुराव्यांच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात त्यांनाअटक करण्यात आली.
ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, विलास शिंदे, बाजीराव विर, प्रदिप गाडे, चक्रधर शिरगीरे, राहुल कडीले, सचिन सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.