संदीप टूले
केडगाव : मागील दोन अडीच महिन्यापासून दौंड तालुक्यात पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलाव, बंधारे, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअरवेलमधील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दौंड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून पाच गावांतील ग्रामपंचायत हद्दीत पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. जवळूनच खडकवासला कालवा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे, मात्र पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पाटबंधारे विभागाकडून सोडले जात नाही.
वरवंड ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारी २३ एप्रिल रोजी आक्रमक पवित्रा घेत अखेर कालव्याच्या वितरिकेचे दोन दरवाजे तोडून वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात पाणी सोडले. मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात सातत्याने करीत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी पाणी सोडण्याच्या संदर्भात टाळाटाळ करीत आहेत. अखेर वरवंड ग्रामपंचायत प्रशासनाने खडकवासला कालव्याच्या वरवंड तलावात पाणी सोडणाऱ्या वितरिकाचे दोन दरवाजे तोडून तलावात पाणी सोडले.
पाटबंधारे विभागाने हे दरवाजे बंद केल्यास पुन्हा दरवाजे तोडून पाणी सोडण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. वरवंड ग्रामपंचायतच्या सरपंच मिनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, सदस्य तानाजी दिवेकर, प्रदिप दिवेकर, कांतीलाल टेगंले, मिना रामदास दिवेकर, अर्चना रणधीर, संगिता सातपुते, फारजाना शेख, मीरा दिवेकर, मंदाकिनी खोमणे, मारुती फरगडे आदींनी पाणी सोडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान, व्हिक्टोरिया तलावात पाणीसाठ्यावर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत कंपन्या, तालुक्यातील अनेक गावांचा जलजीवन योजना तसेच बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई योजनेचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. कालव्याच्या वितरका फोडून पाणी तलावात सोडल्याने शेत पिकांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.