पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्याचे रेडीरेकनरचे दर जाहीर केले आहेत. राज्यात सरासरी ३.८९ टक्क्यांनी दर वाढले आहेत. तर, पुणे शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ४.१६ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुणे शहरात घर घेण्याच्या दृष्टीने लॉ कॉलेज रस्ता (विधी महाविद्यालय) हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. या परिसरात सदनिकेचा दर प्रति चौरस मीटर १ लाख ८० हजार ९५० रुपये इतका आहे. तर, ऑफिससाठीचा दर २ लाख ८ हजार १०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर कोरेगाव पार्क परिसर आहे. या परिसरात सदनिकांचा दर १ लाख ७९ हजार ४९० रुपये प्रति चौरस मीटर तर ऑफिससाठीचा दर हा २ लाख ६ हजार ४२० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.
पुणे शहरात दुकानांसाठीचा सर्वाधिक महागडा परिसर जंगली महाराज रस्ता हा असून, या परिसरात दुकानांचा दर ४ लाख ७५ हजार ९४० रुपये प्रति चौरस मीटर असा आहे. तर, शहरात जमिनीचा सर्वाधिक कमी दर हा नांदोशी गावात आहे. या ठिकाणी २ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. त्याखालोखाल किरकीटवाडी येथे २ हजार ६८० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.
राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनरच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे. यंदाच्या म्हणजे २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेडीरेकनरमध्ये वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारी (दि. १) करण्यात येत आहे. त्यामध्ये शहरातील जमीन, सदनिका, आऑफिस आणि दुकाने यांचे दर देण्यात आले आहेत. त्यातील आकडेवारीनुसार शहरातील टॉप टेन भागातील दर नोंदणी विभागाने जाहीर केले आहेत.