आज २७ फेब्रुवारी, आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांनी देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी अथक मेहनत घेतली. त्यांनी केलेल्या संघर्षाला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानिमित्त…
आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेबद्दल संत, साहित्यिकांनी खूप काही लिहून ठेवले आहे. मातृभाषेची तुलना अमृताशी करताना संत ज्ञानेश्वरांनी यांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’ असे म्हटले आहे. अथक प्रयत्न-संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन मुंबई ही राज्याची राजधानी बनली. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषिक बहुसंख्य असले, तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला. बरेचसे साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला.
कुसुमाग्रजांचा संघर्ष
मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे. अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते. देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव करण्याचेही राज्य सरकारने योजिले होते.
जागतिक दर्जाचं लेखन
कुसुमाग्रज यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचं जन्मगाव. वि. वा. शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव कुसुम होतं. त्या नावावरुनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेनं आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीनं जागतिक दर्जाचं लेखन केलं.
कुसुमाग्रजांनी मराठीसाठी जीवन वेचलं
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीनं त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावानं त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे.
अक्षरबाग (१९९०), किनारा (१९५२), चाफा (१९९८), छंदोमयी (१९८२), जाईचा कुंज (१९३६), जीवन लहरी (१९३३), थांब सहेली (२००२), पांथेय (१९८९), प्रवासी पक्षी (१९८९), मराठी माती (१९६०) ही कुसुमाग्रजांचे गाजलेले कवितासंग्रह. तर, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटकं. कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्याही कुसुमाग्रजांनी लिहिल्या.
पाच दशकांपेक्षा जास्त असलेल्या त्यांच्या त्यांनी १६ खंड कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात खंड निबंध, १८ नाटके आणि सहा एकांकिका अशा कलाकृती लिहून प्रकाशित केल्या. १९८७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला. विशाखा या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. वि.स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक आहेत.
ज्ञानपीठ, मराठी साहित्य अकादमी पुरस्कारासारख्या असंख्य पुरस्कारांनी त्यांचा गौरवण्यात आले आहे. १९९१ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले. एकूण कार्यकाळामध्ये ते मराठी भाषेच्या उन्नतीसाठी झटत राहिले.