उरुळी कांचन, (पुणे) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’योजनेसाठीच्या ॲपमध्ये सध्या तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरातील महिला अर्ज भरण्यासाठी त्रस्त होत आहेत.
सदरचे ॲप कधी सुरू होणार याची विचारणा महिला वर्गातून सुरु झाली आहे. मंगळवारी (ता. 30) सकाळपासूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’योजनेसाठीच्या ॲपमध्ये लॉगिन करताना अडथळा येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम होत नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिला या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करत आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला 1500 रूपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सीएससी व सेतू केंद्रांवर महिलांची एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याबाबतच्या अटी मध्ये सातत्याने बदल होत होते. त्यामुळे महिलांना नाव नोंदणीसाठी हेलपाटे मारून कागदांच्या जुळवाजुळवित वेळ घालवावा लागत होता.
मात्र, मंगळवारी सकाळपासूनच ॲपचे सर्व्हर सातत्याने लोडवर असल्यामुळे बहुसंख्य महिला अर्ज भरू शकल्या नाहीत. 15 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे सध्या नोंदणीसाठी महिलांची धावपळ सुरू आहे, परंतु सदर यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे ते ॲप ओपन होत नसल्याने महिला आणखीनच त्रस्त झाल्या. याबाबत प्रयत्न केले असता सर्व्हिस अनअॅवेलेबल असा संदेश येत आहे. ॲप मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे नवीन नोंदणी होत नाही.
दरम्यान, शासनाने अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून मग तो अंगणवाडीत जमा करण्याचा पर्याय दिल्याने महिलांची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी धांदल उडत आहे. ॲप बंद असल्याने ॲप कधी सुरू होणार याच्या प्रतिक्षेत महिला आहेत.
कामावर परिणाम
पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या शेतीचे कामे सुरू आहेत. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कामगार, शेतमजूर महिलांची संख्या मोठी आहे. अर्ज करण्यासाठी कामे सोडून तासनतास बसावे लागत असून वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
याबाबत बोलताना अंगणवाडी पर्यवेक्षिका शांताबाई सिद म्हणाल्या, “मागील, दोन दिवसांपासून ॲप मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे फॉर्म भरता येत नाहीत. “महिला बालविकास कार्यालयाच्या आदेशानुसार फॉर्मची पडताळणी सुरु केली आहे. ज्या महिलांची कागदपत्रे अपुरी आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे. त्यांना परत एकदा फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून एडीटचा पर्याय देण्यात आला आहे.”
सामाजिक कार्यकर्ते संभाजी कांचन म्हणाले, “सरकार सर्व योजना ऑनलाईन जाहीर करतंय पण प्रशासन योग्य त्या प्रकारे सर्व्हर चालतील आणि जनतेला त्रास कमी होईल याची काळजी घेत नाही, अशी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली.”