हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) Koregaon Mul News : कोरेगाव मूळ (ता. हवेली) Koregaon Mul News ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायरान परिसरात लावलेली लाखो रुपयांची झाडे पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. (Koregaon Mul News)
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. झाडे जगवणे ही काळाची गरज असून, शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु वृक्ष संगोपन होत नसल्याकारणाने, पावसाळ्यात लावलेली झाडे एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यातच पाणी न दिल्याने जळून जाण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.
कोरेगाव मूळ गायरान परिसरात मागील चार वर्षापूर्वी झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. यासाठी ८० हजार रुपये खर्च करून पाण्याची ड्रीप करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पाणी दिले आहे. मात्र पाणी सोडण्याअभावी ही झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही झाडे जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच ही झाडे जळून अथवा सुकलेल्या अवस्थेत दिसून आल्यास जिल्हा परिषद कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सांगितले.
दरम्यान, याबाबत काही नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता, तेवढ्यापुरते त्या व्यक्तीचे समाधान करून पहिले पाढे पंचावन हीच परिस्थिती सध्या सुरु आहे. मागील दीड महिन्यांपासून सदर झाडांना पाणी मिळाले नाही. उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता ग्रुप आठ दिवसाला येथील झाडांना येऊन पाणी घालीत आहेत. ग्रामपंचायतीने चार वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनाअभावी झाडे जळून चालली असल्याचा आरोप कोरेगाव मूळ येथील नागरिक करीत आहेत.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जगताप म्हणाले, सदर झाडांना आठवड्यातून एकदा पाणी सुरु आहे. कर्मचारी कामात असल्याने एखाद्या आठवड्यात पाणी दिले नसेल मात्र झाडांना आठ दिवसाला पाणी सुरु आहे.
उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप याला अपवाद..!
पावसाळा आला की, दरवर्षी ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही घोषणा देत शासनाकडून, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येते. परंतु संगोपनाची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे ही झाडे उन्हाळ्यात पाण्याअभावी जळून जातात. परंतु याला अपवाद उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप आहे. मागील अनेक वर्षापासून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन, भर उन्हाळ्यात नेटके नियोजन करत झाडे जगवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, अभियंता, नोकरदार, व शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.