पुणे: आज, १२ मे रोजी देशभरात बुद्ध पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात हा प्रश्न अनेकदा उद्भवतो की आज बँका सुरु आहेत की बंद? शाळांमध्ये सुट्ट्या असतात का? सरकारी कार्यालयांची स्थिती काय आहे? तर आज काय बंद राहील आणि काय सुरु ते आपण जाणून घेऊयात…
या शहरांमध्ये बँका बंद राहतील
जर तुम्ही आज सोमवारी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर एक मिनिट थांबा. आरबीआय कॅलेंडरनुसार, आज १२ मे २०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशाच्या काही भागात बँका बंद राहतील. यामध्ये आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, डेहराडून, इटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर या शहरांचा समावेश आहे. म्हणजेच, जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल, तर आजच बँकेत जाण्यापूर्वी, सुट्ट्यांची यादी तपासा.
या महिन्यात बँका कधी बंद राहतील?
मे महिन्यात एकूण ६ सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, दर रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. या आठवड्याच्या शेवटी १६ मे रोजी राज्य दिनानिमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर २४ मे रोजी चौथा शनिवार असल्याने आणि २५ मे रोजी रविवार असल्याने बँका पुन्हा बंद राहतील. २६ मे रोजी त्रिपुरामध्ये काझी नजरुल इस्लाम यांच्या जयंतीनिमित्त आणि २९ मे रोजी हिमाचल प्रदेशमध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
आज बँका बंद असल्या तरी, तुम्ही मोबाईल अॅप्स, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सारख्या डिजिटल बँकिंगच्या मदतीने पैशांचे व्यवहार सुरू ठेवू शकता. तथापि, चेक किंवा प्रॉमिसरी नोट्सचा वापर करणे शक्य होणार नाही. कारण याचे व्यवहार फक्त बँक सुरु असतानाच केले जातात.
शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी
दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल सारख्या राज्यात सोमवारी शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. ही सार्वजनिक सुट्टी असल्याने सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्टी असेल. याशिवाय भारत-पाकिस्तान तणावामुळे काही संवेदनशील भागात शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत.
शेअर बाजार बंद आहे की सुरु ?
आता जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की, बुद्ध पौर्णिमेला एनएसई आणि बीएसई देखील बंद राहतील का? तर उत्तर आहे – नाही. सोमवार, १२ मे रोजी शेअर बाजार नेहमीप्रमाणे खुले राहतील आणि व्यवहार सुरू राहतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
सरकारी कार्यालये आणि पोस्ट ऑफिस देखील बंद
ही राजपत्रित सुट्टी असल्याने, केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी कार्यालये जसे की, पोस्ट ऑफिस, मंत्रालये इत्यादी बंद राहतील. राजपत्रित सुट्ट्या म्हणजे ज्या सरकारकडून अधिकृत राजपत्रात जाहीर केल्या जातात.
बुद्ध पौर्णिमा हा एक आध्यात्मिक उत्सव आहे, जो शांती, करुणा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल किंवा बँकेशी संबंधित काही काम पूर्ण करायचे असेल, तर सुट्टीमुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आधीच तयारी करा.
आपण बुद्ध पौर्णिमा का साजरी करतो?
बुद्ध पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे, जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म झाला. लोक हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करतात. या दिवशी, राजकुमार सिद्धार्थ राजेशाही सुखसोयी आणि समृद्धी सोडून सत्याच्या शोधात निघाले आणि शेवटी बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करून त्यांना ज्ञान मिळाले. नंतर ते भगवान बुद्ध झाले आणि बौद्ध धर्माची सुरुवात केली. असे मानले जाते की, या दिवशी त्यांचा जन्म झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि नंतर याच दिवशी त्यांचे निधन झाले.
हा दिवस दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भारतासह श्रीलंका, नेपाळ, थायलंड, जपान आणि चीन यासारख्या अनेक आशियाई देशांमध्ये हा सण मोठ्या भक्तीने साजरा केला जातो. या दिवशी लोक मंदिरांना भेट देतात, भगवान बुद्धांच्या प्रतिमेला स्नान घालतात, उपवास करतात आणि शांती आणि करुणेचा संदेश देतात.