पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेत अपहृत बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मोहम्मद खान कुरेशी (वय-२७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय-२५) यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातून १७ सप्टेंबर रोजी पूजा दास नातेवाईकांसोबत झारखंडला चालल्या होत्या. त्यांच्याबरोबर सात महिन्यांचा मुलगा देखील होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख करून त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यानंतर पूजा यांच्या ताब्यातून बाळाला नजमाने घेतले. त्यांचे दुर्लक्ष होताच मोहम्मद आणि नजमा हे दोघे बाळाला घेऊन पसार झाले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण केल्याने मोठी खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरु करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक अहमदाबादला रवाना होत नजमा आणि मोहम्मद यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, इरफान शेख, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सचिन नाझरे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, अनिल टेके, आनंद कांबळे, निलेश बीडकर, अनिल दांगट, विकास केंद्रे, जयश्री ढाकरे यांनी केली.