गणेश सुळ
केडगाव (Kedgaon News): पुणे – सोलापूर महामार्गावरील चौफुला येथील सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने व कायमस्वरूपी बुजवावे. तसेच प्रशासन दखल घेत नसल्याने बोरीपार्धी, धायगुडे वाडी, चौफुला ग्रामस्थ यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या सेवा रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचाकांना अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. येथून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, शेतकरी, दुग्ध व्यवसयिक, प्रवाशी वर्ग आणि व्यावसायिक यांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी देखील केल्या, मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, असे प्रतिपादन बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर यांनी केले.
आंदोलन सुरू केले असता यवत पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, बारवकर, कुतवळ यांनी निवेदन स्वीकारले व सबंधित अधिकारी वर्ग यांना सूचना देऊन तातडीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. महामार्ग अधिकाऱ्यांनीही तातडीने कामाला सुरुवात केली व सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने परिसरातील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. याप्रसंगी भिमा पाटसचे माजी चेअरमन आनंद थोरात, सरपंच सुनील सोडनवर, संपत मगर, संजय धायगुडे, रघुनाथ सरगर, दिनेश गडद्ये, सिध्देश्वर सरगर, राजू कोळपे, डॉ. हंडाळ व परिसरातील अनेक पदाधिकारी व नागरीक उपस्थीत होते.
बोरीपार्धी आणि चौफुला येथील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या या आंदोलनामुळे झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. महामार्ग अधिकाऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात देखील केली आहे. या 2 ते 3 फुटाच्या खड्ड्यांमुळे त्रस्त प्रवाशी वर्ग यांना लवकरच यातून सुटका मिळेल.
आनंद थोरात – मा.चेरमन भिमा सहकारी साखर कारखाना, पाटस