Loni Kalbhor: लोणी काळभोर, (पुणे): पुणे – सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यान वारंवार होणारे अपघात व या मार्गावरील सततची वहातुक कोंडी टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. प्राधिकरणाकडून मंगळवार (५ डिसेंबर) पासुन कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होणार आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस १५ मीटरच्या आत असलेली अतिकमणे व विना परवाना बांधकाम हटविण्यात येणार आहेत. दरम्यान उरुळी कांचन, लोणी स्टेशन, कुंजीरवाडीसह महामार्गावर अतिक्रमण काढताना कायदा व सुवस्थेचा प्रश्न उभा राहू नये, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पोलिसांसह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे मदत मागितली आहे.
प्राधिकरणाने गेल्या वर्षी देखील पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ते कासुर्डी या दरम्यानची दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटवली होती. मात्र, वर्षभराच्या आतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मागील वर्षापेक्षाही जास्त अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्याच्या कडेला व्यावसायिक दुकानांसाठी इमारती उभारल्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. यामुळे त्या काळात अपघाताचे प्रमाही मोठ्या प्रमाणात वाढले होते.
अनेकांना आपले जीवही गमवावे लागले होते. तर दुसरीकडे उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोंडी होत असल्याने, नेते आणि प्रसाशनाला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वहातुक पोलिस व स्थानिक ग्रामपंचायतींनी यामधून मार्ग काढावा यासाठी “पुणे प्राईम न्यूज” ने सात्यत्याने आवाज उठवला होता. अखेर “पुणे प्राईम न्यूज” च्या प्रयत्नांना यश आले असुन, येत्या मंगळवारपासुन कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी या दरम्यानचे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, कवडीपाठ ते कासुर्डी रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस १५ मीटरच्या आत असलेली अतिकमणे व विना परवाना बांधकाम ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाच्या आत त्वरीत काढून घेण्यात यावीत, अशी विनंती प्राधिकरणाने केली आहे. या सात दिवसाच्या आत अतिक्रमणे न हटवल्यास त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येणार आहे.
तळवडी चौक मोकळा श्वास घेणार का?
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौक अतिक्रमण व वाहतुक कोंडीचे सर्वात मोठे आगार बनले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या इमारतींच्या बाहेर सेवा रस्ताच नव्हे तर मुख्य रस्त्यावरही दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याचे दिसुन येत आहे. या अतिक्रमणांना स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक नेते यांचे पाठबळ असल्याने, या ठिकाणच्या चौकांची अवस्था अतिशय गंभीर बनली आहे. शिंदवणेकडे व उरुळी कांचन गावात जाणाऱ्या रस्त्यावर तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला टपरीचालक, फळेविक्रेते यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
दोन्ही बाजूला हातगाडी, दुचाकी, रिक्षा, आदी वाहनांनी व्यापला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका बड्या रुग्णालयात रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी असलेल्या हातगाड्या, दुचाकी, रिक्षा यांच्यावर कारवाई होईल का? याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जरी संबंधित अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करणार असले, तरी त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल येथील नागरिकांच्या मनात शंका आहे. कारण मागच्या वर्षीच्या कारवाईचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे फक्त एकदा कारवाई करून भागणार नाही, असे नागरिकांना वाटत आहे.