पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महादेव बेटिंग अॅप आणि लोटस 365 वेबसाइट अंतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीतील तीन मजली इमारतीत सुरु असलेल्या ऑनलाइन सट्टाप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत 98 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहे तर दोन आरोपी फरार आहेत. उर्वरित 93 आरोपींपैकी पाच जणांना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर 88 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपींना पुणे येथील येरवडा कारागृहात रवाना केले आहे. ऑनलाइन सट्टाप्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहे. फरार असलेला मुख्य सूत्रधार नारायणगावचा ऋत्विक सुरेश कोठारी व जुन्नरचा राज बोकरिया यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
मंगळवारी (ता.14) मध्यरात्रीपासून पोलिसांनी सुरू केलेली कारवाई गुरुवारी (ता.16) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील सर्व आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तीन मजली इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज, संगणक, कर्मचाऱ्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची व वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.