दौंड (पुणे) : स्कुटीचा हप्ता भरला नसल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ, दमदाटी करून दगडाने मारहाण केली. ही घटना दौंड शहरात शनिवारी (ता. 11) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
योगेश कांबळे (पूर्ण नाव माहीत नाही रा.वेताळनगर ता. दौंड) व त्याच्यासोबतचे अनोळखी दोन अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. तर रोहीत दत्ता शिंदे (रा.वडारगल्ली, दौंड, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी किरण विजय गुळीक (वय २२, रा. वडारगल्ली, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिन्ही आरोपींवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गुळीक यांनी आयडीएफसी बँकेकडून लोन काढून 2023 मध्ये नवीन दुचाकी खरेदी केली होती. शनिवारी दुपारी घरातील सर्वजण घरी असताना योगेश कांबळे हा नेहमीप्रमाणे गाडीचा हफ्ता घेऊन जाण्यासाठी त्याच्या दोन साथीदारांसमवेत आला होता.
यावेळी कांबळे म्हणाला की, स्कुटीचा हप्ता का भरला नाही, त्यावेळी फिर्यादी यांनी ‘तुम्ही माझी गाडी पासिंग केल्यानंतरच मी गाडीचा हप्ता भरेन’ असे सांगितले. यावेळी कांबळे व त्याच्या दोन्ही साथीदारांनी चिडून जाऊन शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच कांबळे याने फिर्यादीची गचांडी धरली. ही भांडणे शेजारी राहणारा मित्र रोहीत शिंदे याने पहिली व वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी योगेश कांबळे याने तेथेच पडलेला दगड उचलुन रोहीत शिंदे याच्या डोक्यात मारुन दुखापत केली.
दरम्यान, या घटनेनंतर योगेश कांबळे व त्याचे दोन साथीदार हे त्या ठिकाणावरून पळून गेले. याप्रकरणी किरण गुळीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.