हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. ऋषिकेश संतोष मोटे (वय – २० रा. फुरसुंगी रोडवर खुटवड चौक ऋषिकेश हॉटेल वरती फुरसुंगी), प्रदीप भागवत पौळ (वय – २०, रा. चंदवडी कॅनॉल जवळील बिल्डींगमध्ये फुरसुंगी), कृष्णा भिमा पवळ (वय १९, रा. कामठे आळी, चक्रधर ढवळे फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. २३) ओंकार विलास जगताप, रा. कॉर्नर लिफ सोसायटी, फुरसुंगी भेकराई रोड, खुटवड चौक, पुणे, यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री १ ते पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. या घटनेत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहीत्य असे एकुण ३ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेह्ल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा वरील तीन आरोपींनी केला असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली. तसेच अधिक तपासात ऋषीकेश मोटे याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींकडून हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली एक बुलेट व एक दुचाकी अशा २ लाख रुपयांच्या दोन गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने केली आहे.