उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील वयोवृद्ध महिला सायंकाळी पायी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या असता, तीन भामट्यांनी त्यांना हेरले आणि तुम्हाला रेशनिंग कार्ड काढायचे आहे का? फुकटचे रेशनिंग व पाच हजार रुपये सुद्धा मिळणार आहे. असे म्हणून संशयित भामट्यांनी हातचलाखीने आजीच्या गळ्यातील व कानातील सुमारे 50 ते 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. साखरबाई नवनाथ बदर (वय-60, रा. चक्रधर ज्वेलर्स मागे एम .जी. रोड उरुळी कांचन, ता. हवेली) असं वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अद्यापही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. हा प्रकार शनिवारी (ता. 16) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चक्रधर कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध आजी साखरबाई बदर या महात्मा गांधी रस्त्यावरील चक्रधर कॉम्प्लेक्सच्या मागे राहतात. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्याठिकाणी एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा आला आणि त्यांना म्हणाला आजी तुम्हाला रेशनिंग कार्ड काढायचे आहे का? फुकटचे रेशनिंग मिळणार आहे. पाच हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत.
महात्मा गांधी रस्त्यावरील कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर दोन साहेब बसले आहेत, ते काढून देतायेत चला मी तुम्हाला दाखवतो. आम्ही पण काढले आहे. अशी माहिती सदर 13 ते 14 वर्षाच्या मुलाने आजीला दिली. त्यामुळे आजी त्याच्यासोबत गेल्या. कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर दोन व्यक्ती बसलेली होती. यावेळी त्या ठिकाणावरून तो मुलगा निघून गेला. ती दोघे म्हणाली की आजी बसा हे दोनशे रुपये घ्या. तुम्हाला आणि तुमच्या गळ्यातले आणि कानातले काढून पाकिटात ठेवा व साहेबांची चेकिंग झाल्यानंतर मग घाला, त्यानंतर एक साहेब आपल्याला हे काम करून देणार आहेत.
यावेळी त्या आजीनी गळ्यातील व कानातील काढून दिले. व ते दोघेजण साहेबांना बोलावून आणतो, असे म्हणून निघून गेली. आजींना काहीच समजले नाही. आजीने अर्धा तास वाट पाहिली कोणीच आले नाही. आजी अर्धा तास थांबल्या आणि कुणीच न आल्यामुळे त्या घरी आल्या पिशवी उघडून बघतात तर त्यांचे पाकीटही नाही आणि त्या पाकिटमध्ये आधार कार्ड होते, त्या लोकांनी दिलेले दोनशे रुपये होते. आजीच्या गळ्यातले आणि कानातले असे जवळजवळ अर्धा पाऊण तोळ्याचा ऐवज होता ते घेऊन आरोपी पसार झाले.
दरम्यान, आजीने नंतर पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली. यावेळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. पोलीस तपास चालू आहे, पण असे अजून कोणाच्या बाबतीत घडले आहे का? किंवा असे घडू नये म्हणून सावधानता बाळगावी. कोणाच्या बाबतीत हा प्रकार घडू नये म्हणून सर्व अशिक्षित गरीब नागरिकांनी सावध राहावे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस कशा प्रकारे तपास करून आरोपींना पकडतात. याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.