पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात अटकसत्र आणि धक्कादायक खुलासे सुरुच आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर तब्बल 24 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सुरुवातीला या प्रकरणात रविवारपर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी नवी मुंबईतून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करताना आणखी 11 जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 24 वर जाऊन पोहोचली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ताब्यात घेतलं आहे. पनवेल ते वाशी या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान त्यांना अटक केली. यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली.
दरम्यान, आता शरद मोहोळ प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येच्या कटातील सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. शहरातील जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दकीच्या हत्येचे कनेक्शन शरद मोहोळ हत्याकांडाशी असल्याचा दावा करण्यात येत आहे. मिलींद एकबोटे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी खरा सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे. 28 जानेवारी रोजी याबाबत पुण्यात मोर्चासुद्धा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूडपर्यंत हा मोर्चा काढणार येणार आहे.
शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव या दोघांवर जून 2012 मध्ये जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी कातील सिद्दीकीचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये झालेल्या गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणात शरद मोहोळचेही नाव होते. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, मोहोळ याने या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.