लोणी काळभोर (पुणे): जप्त मुद्देमाल वाहन विक्री प्रकरणात लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील चार पोलिसांचे निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच, लोणी काळभोर पोलिसांच्या आणखी एका काळ्या कारनाम्याची चर्चा उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीत जोरदार रंगू लागली आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस ठाणे वेगळे होत असताना, पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांनी उरुळी कांचन पोलिस चौकीतील एका “झिरो” पोलिसांच्या मदतीने, लोणी काळभोर पोलिसांनी यापुर्वी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या काही दुचाकी वाहनांची विक्री खुल्या बाजारात केल्याचे प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणातील चार पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईची शाई वाळण्यापुर्वीच, लोणी काळभोर पोलिसांनी जप्त करुन उरुळी कांचन पोलिस चौकीच्या आवारात ठेवलेल्या तीन ट्रक वाळूचीही पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा नागरिकांबरोबर खुद्द पोलिसांमध्येही सुरु झाली आहे.
पुणे शहर पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सोमवारी (ता. 28) रात्री उशीरा दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे या चार पोलिसांना, जप्त केलेली काही दुचाकी वाहने परस्पर खुल्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान वरील चार पोलिसांनी काही दुचाकी वाहनांबरोबर उरुळी कांचन पोलिस चौकीत जप्त असलेल्या तीन ट्रक वाळूचीही खुल्या बाजारात विल्हेवाट लावल्याची चर्चा सुरु झाली आहे. उरुळी कांचन पोलिस चौकीतून विल्हेवाट लावलेल्या वाळूची खुल्या बाजारातील किंमत सव्वा लाख रुपयांच्या आसपास असुन वाळू विक्रीत एका वरीष्ठ अधिकाऱ्याचाही हात असल्याची चर्चा आहे.
दरोडेखोरांना अथवा चोरट्यांना मोठ्या शिताफिने व जिवावर उदार होऊन पकडणाऱ्या पोलिसानींच स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच पोलिस ठाण्यात दरोडा होय, शब्दश: दरोडाच टाकल्याचा धक्कादायक प्रकार शहर पोलिस दलाअंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्याने लोणी काळभोर पोलिसांची प्रतिमा काळवंडली होती. मात्र, वाळु प्रकरणामुळे आणखी त्यावर शिंतोडे उडवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुर्व हवेलीमधील नागरीकांनी “पुणे प्राईम न्यूज” कडे केली आहे.
“पुणे प्राईम न्यूज”ला गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हवेली महसुल विभागाने लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर कारवाई करुन, त्यातील वाळु जप्त केली होती. ही वाळु मागील काही दिवसांपासून उरुळी कांचन पोलिस चौकीच्या (आत्ताच्या उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या) आवारात पडून होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस ठाणे वेगळे होत असताना, पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे या चार पोलिस कर्मचाऱ्यांनी उरुळी कांचन पोलिस चौकीतील एका “झिरो” पोलिसांच्या मदतीने, लोणी काळभोर पोलिसांनी यापुर्वी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या काही दुचाकी वाहनांची विक्री खुल्या बाजारात केली होती. एकीकडे दुचाकी वाहनांची विल्हेवाट लावली जात असतानाच, दुसरीकडे उरुळी कांचनमधील एका स्थानिक राजकीय नेत्याच्या मालवाहू ट्रकमधून वाळूची विल्हेवाट लावल्याची चर्चा आहे.
लोणी काळभोरचा “मुद्देमाल कारकून” नेहमीच चर्चेत…
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकूनावर जप्त मुद्देमालाची खुल्या बाजारात विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नसून मागील पंधरा वर्षाच्या काळात तीन वेळा असा गुन्हा दाखल झालेला आहे. पंधरा वर्षांपूर्वी एका बहाद्दुर कारकुनाने पोलिस ठाण्यातील एका महिला सहकाऱ्याला वश करण्यासाठी सोळा लाख रुपयांच्या विविध मुद्दे्मालाची विल्हेवाट लावली होती. तर दुसऱ्या एका घटनेत उरुळी कांचन पोलिस चौकीच्या आवारातील जप्त पाच पेक्षा अधिक वाहने एका कारकुनाने व एका पोलिस हवालदारांने स्वतःच्या शेतावर गड्यांना वापरायला दिली होती. वरील दोन्ही प्रकरणात एका पत्रकारांच्या चाणाक्ष नजरेमुळे गुन्हा दाखल झाला होता हे विशेष. याही प्रकरणात “पुणे प्राईम न्यूज” जागल्याची भुमिका बजावणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात लक्ष घालुन दोषींवर कडक व जरब बसेल, अशी कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे.
”पुणे प्राईम न्यूज”च्या बातमीवर शिक्कामोर्तब
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील उरुळी कांचन पोलीस चौकीत (सध्या उरुळी कांचन ग्रामीण पोलीस ठाणे) येथे जप्त करून लावण्यात आलेली वाहने चोरी प्रकरणी झिरो पोलीस बाळासाहेब रामचंद्र घाडगे यास अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली त्याने दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलिसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले. यावेळी जप्त करण्यात आलेली वाहने निलंबित पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलून नेऊन स्क्रॅप केली होती. स्क्रॅप गाड्या घेणारा भंगार व्यवसायिक इम्रान महंमद शेख याने निलंबित पोलिसांना ४ लाख ६० हजार दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आता चार पोलिसांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे ”पुणे प्राईम न्यूज”च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.