पुणे : पुणे शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून (शनिवार) प्रारंभ होत आहे. पुणे पोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, साडेपाच हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. पुढील दहा दिवस अहोरात्र बंदोबस्त असणार आहे. याबाबतची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या वेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल शिळे उपस्थित होते.
१३५६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे गुन्हे शाखेची पथके, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) नियमित जवान, तपासणी करण्यात येणार आहे. गर्दी, गैरप्रकारांवर शहरातील वेगवेगळ्या भागात लावलेले १३५६ सीसीटीव्ही कमरे नजर ठेवणार आहेत. प्रत्येक मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिसांनी गणेश मंडळांना दिल्या आहे.
उत्सवात मध्यभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीत मोबाईल, रोकड, दागिने चोरीला जातात, पोलिसांनी चोरट्यांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरातील लॉज, हॉटेलची पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात येणार आहे. गर्दीत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.