लोणी काळभोर, (पुणे) : चष्म्याचे बाकी राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याने दुकानदाराला दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०६) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ ते ८ जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
विलास विरकर, धीरज विरकर, बाळा भांड, (रा. तिघेही, लोणी काळभोर, ता. हवेली) व इतर ३ ते ४ जणांच्या विरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागेश बळीराम औरादे (वय- २३, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लोणी स्टेशन चौकातील माई हाइट्स या ठिकाणी असलेल्या वसाहतीत चष्म्याचे दुकान आहे. मंगळवारी संध्याकाळी दुकानात विलास विरकर, विराज विरकर, बाळा भांड व अनोळखी ३ ते ४ जण हे दुचाकीवरून आले होते.
चष्मा घेत असताना दुकानदार औरादे यांनी बाकी राहिलेले उधारीचे पैसे मागितले. पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच दुकानातील काही साहित्य देखील फोडले. यावेळी चौकातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, शेजारी असलेल्या एका तरुणाला हाताने, काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी औरादे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.