इंदापूर : अल्पवयीन मुलीच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरुन एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धाराम बाळू बेळले (रा. वळसंग, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. साक्षी बसवराज नायकोडी (वय १६, रा. शेषगिरी, ता. अफजलपूर जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी अजिंक्य अशोक इजगुडे (रा. महतीनगर, इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (दि. २२) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास सरडेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत फियार्दीचे शेतात ही घटना घडली. मयत मुलगी साक्षी ही आरोपी सिध्दराम बेळले याच्या साडूची मुलगी आहे. ती त्याच्या ताब्यातील जॉन डीअर ट्रॅक्टरच्या (क्र.एम एच ४२ एफ १०५४) बाजूला उभी असताना आरोपीने ट्रॅक्टर हयगयीने चालवून डाव्या बाजूच्या पाठीमागच्या चाकांनी धडक दिली. त्यामुळे ती खाली पडली. तिच्या गळ्यातील ओढणीसह रोटावेटरमध्ये गुंतून गळ्याला व तोंडाला झालेल्या गंभीर जखमांमुळे मयत झाली, असे इजगुडे यांनी फियार्दीत म्हटले आहे.