पिंपरी : बडतर्फ केल्याच्या रागातून एचआर विभागात काम करणाऱ्या महिलेने शाळेची बदनामी केली. तसेच शाळेचा लॅपटॉप परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी रविवारी (दि.३०) देहूरोड पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आलोककुमार ओबेरॉय (वय ४२, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३८ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ डिसेंबर २०२४ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत देहुगाव येथे घडला. फिर्यादी अलोक कुमार हे अभंग इंग्लिश मीडियम स्कूल, देहूगाव या शाळेचे संचालक आहेत. शाळेमध्ये आरोपी महिला एचआर म्हणून काम करत होती. तिने शाळेत काम सुरू केल्यापासून कामावर उशिरा येणे, विनापरवानगी गैरहजर राहणे, कामगारांचे मनोबल खच्चीकरण होईल असे वर्तन केले. त्यामुळे’ शाळा प्रशासनाने एचआर महिलेला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेने स्वतः राजीनामा दिला. शाळेची बदनामी होईल, असे वर्तन केले. तसेच शाळेने दिलेला पंधरा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप शाळेला परत न करता विश्वासघात केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.