शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे ऐन बाजाराच्या दिवशी पत्त्यांच्या सहाय्याने सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. मात्र पोलीस आल्याचे पाहून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जुगारी फरार झाले असून पोलिसांनी रवींद्र गंगाराम साळवे व बालाजी सुदाम भांडवलकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील बाजाराच्या जवळ स्मशान भूमीलगत काही इसम पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस हवालदार श्रावण गुपचे, उद्धव भालेराव, विकास सरोदे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना दोन इसम पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळवत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांना पाहून ते पळू लागल्याने पोलिसांनी त्यांना आवाज देत थांबण्यास सांगितले. मात्र, दोघेजण गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले.
याबाबत पोलीस हवालदार उद्धव कोंडीराम भालेराव (वय ३५ रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी रवींद्र गंगाराम साळवे (रा. नाणेकर चाळ, पिंपरी चिंचवड) व बालाजी सुदाम भांडवलकर (रा. कोरेगाव भीमा) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहेत.