बारामती, (पुणे) : बारामती पोलीस ठाण्यातच सुरु असलेली भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. 29) मध्यरात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आल्या असून तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी जगताप, विकास जगताप, गणेश पाठक, ओम जगताप, तनु जगताप, अजय नागे, अनिता दिनेश जगताप (सर्व रा. आमराई, बारामती) व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया तानाजी मोरे या महिला पोलिस हवालदाराने फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री अनिता दिनेश जगताप, बंटी जगताप व त्यांच्यासोबत इतर काही जण पोलिस ठाण्यात आले. यातील बंटी जगताप हा जखमी असल्याने त्याला औषधोपचाराची यादी घेऊन जाण्यासाठी सांगूनही ते तसेच निघून गेले. त्याचवेळेस धीरज रवींद्र पडकर हा पोलिसांना धक्का देत पोलिस ठाण्यात वेगाने वायरलेस रुममध्ये गेला.
तेथे महिला पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर होत्या. पडकर याच्या मागे बंटी जगताप व इतर सात आठ जण धावत येत त्यांनी पडकर यास पोलिस ठाण्यातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने चाकू आणलेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला आडवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघांनी तेथील आरसा उचलून धीरज याच्या डोक्यात, पाठीत व मानेवर मारुन दखापत केली. आरशाच्या तुकड्यांनी त्यांनी धीरज याच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरही काही जण आरशाचे तुकडे हातात घेऊन अंगावर धावून गेले. तसेच पोलिसांना मारहाण करून पळून गेले.
पहिल्या घटनेत सचिन राजेंद्र पड़कर (रा. भोईटे हॉस्पिटल शेजारी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. बंटी जगताप याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यात आलो असता, गेटवरच दहा ते बारा जण थांबले होते. पोलिस ठाण्यात फिर्याद देतानाच मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून बंटी जगताप, विकी जगताप, बबलू जगताप, अनिता जगताप, गणेश पाठक, अजय ऊर्फ गोठ्या नागे, गौरव भंडारे व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत गौरव दिलीप जगताप यांनी फिर्याद दिली आहे. धीरज पडकर, प्रेम रणपिसे यांनी मोटारसायकलवरून नेत पत्नीस का बोलला, या कारणावरून कोयता काढून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मानेवरचा वार चुकविल्याने नाकाला दुखापत झाली. या प्रकरणी शहर पोलिसांनी धीरज पडकर, सचिन पडकर (रा. इंदापूर रस्ता, बारामती) व प्रेम रणपिसे (रा. मळद, ता. बारामती) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बारामती शहरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.