पुणे: महामाता रमाई या समर्पणाचे प्रतिक आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मातील त्या भक्कम दुवा आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. संविधानातील संस्कृती, मूल्यांना सध्या राजकारण्यांकडून आग लावण्याचे काम होत असताना समाज एकसंघ कसा राहील, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनानिमित्त महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आणि शांताई संस्थेच्या अध्यक्षा रश्मी कांबळे यांचा रमाईरत्न स्मृती पुरस्काराने रविवारी गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महामाता रमामाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सबनीस पुढे म्हणाले, सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहता महामाता रमाई यांच्यासारखी संवादी भूमिका घेतली गेली पाहिजे. सर्व समाज घटकांचे जीवन अर्थपूर्ण व्हावे, यासाठी अशा पुरस्कारांची आवश्यकता असते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. न. म. जोशी म्हणाले, साने गुरुजी यांचे व्याख्यान ऐकत असताना बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती समजली. पुढे पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटता आले. त्यांनी दिलेल्या पैशातून पुस्तके खरेदी केल्याची आठवणही त्यांनी सांगितली. हा पुरस्कार म्हणजे रमाई मातेने केलेले औक्षण आहे, अशी कृतार्थतेची भावनाही डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.