लोणी काळभोर: जिओ मार्टमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजर वस्ती परिसरात आज सोमवारी (ता.3) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. संतोष लेकनाथ बट्टाराय (वय – 45, मूळ रा.नेपाळ, सद्या रा. गणपती कारखान्याजवळ, गुजर वस्ती, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जी. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा मूळ नेपाळचा असून तो कदमवाकवस्ती परिसरात लागेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. संतोष हा गेल्या काही दिवसांपासून जीओ मार्टमध्ये काम करत होता. दरम्यान, गेले तीन दिवस संतोष याच्या घराचा दरवाजा बंद होता. तसेच त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली जाधव, पोलिस हवालदार तानाजी भापकर व महिला पोलीस अंमलदार रूपाली कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घराचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता, संतोष बाथरूममध्ये मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. पोलिसांनी संतोषच्या कुटुंबाशी संपर्क साधला असून याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी संतोष यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संतोष यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.