दौंड,(पुणे) : लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. बोरावकेनगर दौंड येथील हॉटेल अम्बीयन्स येथे ऑगस्ट 2024 (दिनांक पूर्ण माहितीनाही) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एका 55 वर्षीय व्यक्तीवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र दादा कांबळे (वय-55, मूळ रा. खानोटा, ता. दौंड, जि. पुणे, सध्या रा. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथून फिर्यादी महिलेस दौंडमधील बोरावकेनगर येथील हॉटेल अंबीयन्समध्ये आरोपीने आणले होते. लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राजेंद्र दादा कांबळे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 376, 352 अन्वये गुन्हा (गु.र.नं 302/2025) दाखल करून आरोपी कांबळे याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.