गणेश सुळ
Daund News : केडगाव : सासू-सुनेचे नाते म्हणजे विळी भोपळ्याचे नाते, असा गैरसमज आजही समाजात पसरलेला आहे. विशेषत: मालिकांमध्ये सासू-सुना एकमेकींच्या जीवावर उठलेल्या दाखवल्या जातात. परंतु वास्तवात अशी अनेक कुटुंबे आढळतात, जिथे सासू सुनांमध्ये माय-लेकीसारखे दृढ नाते निर्माण होते. एकमेकींचा ऋणानुबंध जुळतो… सासूबाई सुनेची आई कशी झाली अन् सूनबाई सासूची मुलगी कशी झाली… आई आणि मुलीप्रमाणे सासू-सूनेचं नातं घट्ट जपल्याचा प्रत्यय दौंडकरांना आला. सूनबाईला किडनी दान करून या सासूबाईंनी समस्त महिला वर्गासाठी एक आदर्श घालून दिला आहे.
महिला वर्गासाठी एक आदर्श
दौंड तालुक्यातील गिरीम गावात राहणारे पांडुरंग जाधव यांचे २१ जणांचे एकत्र कुटुंब आहे. पांडुरंग जाधव यांच्या पत्नी वैशाली जाधव यांच्या हाता-पायांना सूज येऊन, त्यांना दम लागत होता. त्यांच्या अंगातील रक्त कमी होत होते. या आजारासाठी त्यांनी खूप उपचार देखील घेतले; परंतु फरक काही पडेना. (Daund News) यातून विविध प्रकारच्या तपासण्या केल्या असता, किडनीची समस्या समोर आली. दौंड तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू पवार यांनी वैशाली जाधव यांना किडनी तज्ज्ञ डॉ. सूर्यभान भालेराव यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. विविध तपासण्यांचे रिपोर्ट पाहिले असता डॉक्टरांनी किडन्या निकामी झाल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी वैशाली यांच्या किडनी बदलण्याचा सल्ला दिला. आठवड्यातून दोन वेळा डायलीसिस करण्यास सांगितले. जाधव कुटुंबियांनी डायलीसिस चालू करून किडनी दाता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले; परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरले. वैशाली जाधव यांची दोन्ही मुले या गंभीर परिस्थितीत आपल्या आईचे काय होणार, या कल्पनेने रडवेली झाली होती. अखेर वैशाली जाधव यांचे आई, वडील, चुलते, पती किडनी द्यायला समोर आले. (Daund News) परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. तपासणीअंती यापैकी कोणाचीही किडनी जुळत नव्हती. घरात पुन्हा प्रचंड ताणाचे वातावरण निर्माण झाले.
अखेर पांडुरंग जाधव यांच्या मातोश्री द्रौपदाबाई जाधव यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. सासूचे वय ६८ वर्षे असतानाही ३८ वर्षांच्या सुनेला किडनी जुळली. (Daund News) सून वैशालीचे नशीब बलवत्तर म्हणून हे सर्व उत्तमरित्या जुळून आले. या वेळी सून वैशाली म्हणाल्या की, माझ्या देवदूत सासूबाईंनी मला पुनर्जन्म देऊन माझ्या दोन्ही मुलांना त्यांची आई परत दिली. जन्मभर मी त्यांचे उपकार विसरू शकणार नाही.
या शस्त्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत, सहकार्य आमदार राहुल कुल, सरपंच मनोज जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू पवार यांनी केले.
मुलगा पांडुला दोन लहान मुले. सूनेच्या दोन्ही किडन्या खराब. सून घरात रडायची. नातवंडे पण रडायची. हे बघवत नव्हते. नातवंडांच्या तोंडाकडे पाहून सुनेला हसत हसत किडनी दिली. आता आम्ही दोघीही ठणठणीत आहोत. आज नातवडे, सून, मुलगा आम्ही सगळे खूश आहोत. नशीबाने कोरोनातून जगलो, वाचलो. भरल्या घरात आणखी काय पाहिजे?
– द्रौपदाबाई खंडू जाधव, किडनी दात्या सासूबाई, गिरीम