Daund News : दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. महामार्गावर दूचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत दूचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पाटस घाटाच्या पायथ्याशी सोलापुरवरून प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. २६) पहाटे हा अपघात झाला आहे.
पाटस घाटाच्या पायथ्याशी घडला अपघात
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सत्यभामा शिवराव बोचने (ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशी महिलेचे आहे. एका मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही. (Daund News) दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची माहिती घेऊन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे सोलापूरवरून खासगी लक्झरी बस ३० ते ४० प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. (Daund News) पाटस घाटाच्या पायथ्याशी महामार्गावर रस्त्याच्या कडेला टायर फुटल्याने बसने उभ्या असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसांनी पाटस दौंड व परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. (Daund News) या अपघातात लक्झरी बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडल्याने नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पाटस पोलीस चौकीचे उपपोलीस निरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, श्रीहरी पानसरे, रोहीदास जाधव, रविंद्र ठाकुर तसेच पाटस टोल नाका प्लाझा कंपनीचे व राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक सुरक्षा पथकाने धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करत पोलिसांनी काहीच वेळात वाहतूक सुरळीत केली. पाटस पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राहू येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी; २ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला