गणेश सुळ
Daund News : केडगाव : साखर कारखाने १ नोव्हेंबर रोजी सुरू होतील. यामुळे राज्याच्या विविध भागांमधून दौंड तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रांमध्ये ऊस तोडणी कामगारांचे जत्थे दाखल होत आहेत. यंदा पावसाने दिलेली ओढ, त्यामुळे राज्यभरात खरीप हंगाम वाया गेला. परिणामी हातावरचे पोट असणाऱ्या ऊस तोडणी कामगारांना कामाच्या शोधात हंगामापूर्वीच कारखाना कार्यक्षेत्रात यावे लागत आहे.
खरीप हंगाम वाया गेल्यामुळे हंगामापूर्वीच कामाच्या शोधात
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाची वाढही कमी झाली आहे. त्याचबरोबर क्षेत्रही घटले आहे. उस तोडणी कामगारांच्या भागातही खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. खरीप हंगामातील पिके कमी प्रमाणात असल्याने मजुरांना त्या प्रमाणात काम उपलब्ध होत नाही. ऊसतोड कामगार हे कोरडवाहू जमिनीचे मालक, अल्पभूधारक असतात. वर्षानुवर्षांचा दुष्काळ त्यांच्या डोक्यावर असतो. शिक्षण जेमतेम अक्षरओळख होण्याइतपतच. घरात ऊसतोडीसाठी लागणारे जेवढे जास्त कोयते, तेवढे जास्त पैसे हातात येतात. साहजिकच, कुटुंबातील जितके जास्त हात कामाला लावता येतील तेवढे त्यांच्या दृष्टीने चांगले असते.(Daund News) त्या पैशांतून पुढे वर्षभर घर चालते, कर्जे फिटतात, घरातील लग्ने लागतात. सणवार, उत्सव, यात्रा, कपडे-लत्ते सगळे त्यातूनच मिळतात. त्यामुळे मुले शिकून पुढे काही करतील, त्याचे आणि परिणामत: संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलेल, वगैरे आशा असते. त्यामुळे कारखान्यामध्ये ऊस तोडणी करून उदरनिर्वाह करणारे मजूर कारखान्याकडे मार्गस्थ होत असल्याचे चित्र आहे. सध्या कारखाने सुरू नसल्याने ट्रॅक्टर मालकांच्या माध्यमातून शेतातील मिळेल ती कामे करून हे ऊस तोडणी कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
यंदा पाऊस काळ कमी असल्याने उसाची वाढ व त्यामधून मिळणारी रिकव्हरी याचा विचार न करता कारखानदारांना ऊस गाळप करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पाण्याअभावी शेतामध्ये ऊस जळण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच पावसाची शक्यता कमी झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. (Daund News) त्यामुळे शासनाने ऊस लवकरात लवकर गाळप करण्याच्या दृष्टीने एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उसाबरोबरच मजूरही महत्त्वाचे असतात. त्यामुळे मजूरही अन्यत्र गेल्यास त्याचा फटका कारखानदारीला होऊ शकतो.
– विकास शेलार, संचालक, भिमा सहकारी साखर कारखाना, पाटस
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवाशी जागीच ठार, १८ गंभीर
Daund News : राहू येथे एका रात्रीत ३ ठिकाणी घरफोडी; २ लाख १८ हजारांचा ऐवज लांबवला