दौंड (पुणे) : रहिवासी भागात कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टीम लावल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करून साउंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे. लिंगाळी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. 23) हि घटना घडली. देविदास सुखदेव चव्हाण (वय 23, रा. इंदिरानगर, बाजारतळ, दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दौंड पोलिसांनी साउंड सिस्टिम संच बंद करण्यास सांगितले. परंतु, चव्हाण याने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंगाळी येथील पासलकर वस्तीवरील श्री विठ्ठल मंदिराजवळ एका घरात विवाहानिमित्त रविवारी (ता. 23) पूजा होती. तसेच या परिसरात दौंड न्यायालय, निवासस्थाने आणि एक खासगी रुग्णालय आहे. या ठिकाणी देविदास चव्हाण याने कर्णकर्कश आवाजात गाणी लावण्यात आली होती.
दरम्यान, पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांना कर्णकर्कश आवाजाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार सुधाकर जगताप, विठ्ठल गायकवाड, नाईक बापू रोटे, नीलेश चव्हाण, महादेव जाधव यांना घटनास्थळी पाठविले. यावेळी पोलिसांनी देविदास चव्हाण याला संच बंद करण्यास सांगितले. परंतु त्याने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पोलिसांनी चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची साउंड सिस्टिम जप्त केली आहे.