कोल्हापूर: कोल्हापूर दूध उत्पादक संघाने नुकतेच पत्रक काढत दूधाच्या दरवाढीबाबत माहिती दिली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे. त्यात आता गोकुळने दुधाचे भाव वाढवले आहेत. 4 मे पासून कोल्हापूर दूध उत्पादक संघाने नवे दर लागू केले आहे. तसेच गोकुळ दुधाचे दर 2 रुपयांनी महागणार आहेत.
याबाबत कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढुन दूध दरवाढ जाहीर केली आहे. गोकुळने काढलेल्या पत्रकात कोल्हापूर, मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काढलेल्या पत्रकानुसार गोकुळच्या फुल क्रीम (क्लासिक) दूधाची किंमत आता 74 रुपये प्रतीलिटर, तर 5 लिटरचा पॅक 365 रुपयांना झाला आहे. गाय दूध (सात्विक) 58 रुपये प्रतीलिटर झाले आहे. परंतु, टोण्ड आणि गोकुळ शक्ती दूधाच्या दरात कोणताही बदल होणार नाही. दरात झालेली वाढ ही पॉलिथीन पॅकिंगमधील सर्व दूध प्रकारांसाठी लागू आहे, असे संघाने पत्रकातून स्पष्ट केले आहे.