Loni Kalbhor: उरुळी कांचन(पुणे) : पुणे-सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण आणि दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधांमुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या भागात परराज्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने फसवणूक, गुन्हेगारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
पूर्व हवेलीत हजारो भाडेकरू असून सर्वजण अनोळखी आहेत. त्यामुळे घरमालकांना भाडेकरूंची ७५ टक्के माहिती नसते. लोणी काळभोर पोलिसांनी घरमालकांना आवाहन करूनही पोलिसांना ‘केराची टोपली’ दाखवली आहे. पोलिसांसाठी हे धोक्याचे असून, चोरी, खून, मारामाऱ्यासह चोरीच्या घटनेतील अनेक संशयित आरोपी हे भाड्याने राहत असल्याचे काही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी घरमालकांनी भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.
लोणी काळभोर आणि उरुळी कांचन परिसरात मोठ्या कंपन्या, नर्सरी व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे, शौक्षणिक संस्था असल्याने येथील घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच मजूर आणि लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकही राहतात. ते दिवसभर फिरून पाहाणी करतात. रात्री दुचाकी चोरणे, घरफोडी, मोबाईल चोरीचे प्रकार करतात. त्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात. ज्यावेळी त्यांना अटक होते. त्यावेळी या परिसरात तो भाडेतत्वावर राहत असल्याचे पुढे येते. यासाठी या परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन भाडेकरूंची चौकशी करणे आवश्यक आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावे संवेदनशील म्हणून ओळखली जातात. मागील काही दिवसांपासून उरुळी कांचनसह परिसरात चोऱ्या, मारामारी, बलात्कार यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. तसेच कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या बस स्टॉपवरून एकाला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडून तब्बल ३६ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले होते.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत त्याने एक भाड्याने खोली घेतली होती. याच भाड्याने घेतलेल्या खोलीत जवळपास ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. त्या नोटा बाजारात वितरीत करण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
केवळ भाड्याच्या रकमेसाठी…
गुंतवणुकीसाठी घेतलेले फ्लॅट भाड्याने देणाऱ्यांचे प्रमाण लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह परिसरात वाढत आहे. परिणामी, फ्लॅट भाड्याने देताना चौकशी कोणीच करत नाही. महिन्याला भाडे मिळते ना, एवढ्याच अटीवर कोणालाही फ्लॅट भाड्याने दिला जातो. त्यात परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी, कदमवाकवस्ती येथील घोरपडे वस्ती, रेल्वे स्टेशन, परिसरात भाडेकरूंची संख्या जास्त आहे. त्यातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे.
या भागात आहेत भाडेकरू
– लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी परिसरात सर्वाधिक संख्या..
– नर्सरी व्यवसाय असलेल्या ठिकाणी मोठे वास्तव्य..
– जुना व नवीन उजवा मुळा मुठा कालव्याच्या बाजूला अनेकांचे वास्तव्य..
– लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांची संख्या अधिक..
काय घ्यावी खबरदारी?
– ओळखीशिवाय खोल्या भाड्याने देऊ नये
– भाड्याने खोल्या दिल्यानंतर संबंधितांची माहिती ठेवण्याची सक्ती करावी
– भाडेकरूची माहिती न ठेवणाऱ्या घरमालकांवर पोलिस कारवाई गरजेची
– भाडेकरू परप्रांतीय असल्यास त्याच्या आधारकार्ड व त्याची कागदपत्रे यांची पूर्तता करावी.